शुक्रवार, २५ जुलै, २००८

गडकिल्ले दुर्लक्षित असताना वेगळे शिवस्मारक कशाला?

गड किल्ल्यांनी राखले स्वराज्य ,
गड किल्ल्यांनी स्थापले स्वराज्य।
गड किल्ल्यांतून लढला मावळा ,
गड किल्ल्यांतून महाराष्ट्र घडला।।

उभ्या महाराष्ट्रात आज साडेतीनशेहून अधिक किल्ले आहेत। प्रत्येक किल्याची आठवण छत्रपती शिवरायांशी जोडलेली... काही तर महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेले। पण हे सारे किल्ले आज दुर्लक्षित , उद्ध्वस्त आणि नामशेष होण्याच्या वाटेवर... हे किल्ले म्हणजे मराठी इतिहासाची आणि शिवछत्रपतींची जिवंत स्मारके. पण या सा-या गडकिल्ल्यांची खिंडारे झाली असताना २०० कोटी रुपयांचा खर्च करुन मुंबईमध्ये वेगळे शिवस्मारक हवे का ?
ज्या गडावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी असो , पहिला जिंकलेला गड तोरणा असो , स्वराज्याची पहिली राजधानी राजगड असो किंवा शिवराज्याभिषेक झाला ती राजधानी रायगड असो... आज हा प्रत्येक गड थोडीफार डागडुजी सोडली तर उपेक्षितच म्हणायला हवा। रायगडावरच्या महाराजांच्या पुतळ्यावर साधे छत्र नाही आणि मेघडंबरीत महाराज नाहीत. हे गडच नव्हे , तर महाराष्ट्रातल्या अनेक वास्तूंची अवस्था ‘ नाही चिरा , नाही पणती ’ अशी झालीय. उनवा-यात ऐतिहासिक वास्तू कोसळत आहेत. अशा वेळी मुंबईत पुतळा उभारुन महाराजांची आठवण कशी जागवली जाईल ?
महानगरी मुंबईत स्मारक हवे असे मानले तरी एकट्या मुंबईतच छत्रपती शिवाजी टर्मिनस , छत्रपती शिवाजी विमानतळ , छत्रपती शिवाजी वास्तुसंग्रहालय , शिवाजी पार्क , छत्रपती शिवाजी मार्ग अशा महाराजांचा वारसा मिरवणा-या अनेक वास्तू आहेत। मुंबईतच स्मारक हवे तर मुंबईत असलेल्या एखाद्या किल्ल्यावर ते उभारता आले असते. पण एवढ्यासाठी समुद्रात भराव टाकून नवे स्मारक बनवणं कितपत व्यवहार्य वाटते ?
मुंबईत अत्याधुनिक आणि डोळे दिपवणारे महाराजांचे स्मारक असावे ही स्वागतार्ह आणि आनंदाचीच गोष्ट आहे. पण महाराजांच्या आठवणी अंगाखाद्यावर खेळवणा-या आणि प्रेरणेचे स्रोत असणारे गडकिल्ले उपेक्षित असताना या स्मारकाला अग्रक्रम देणे तुम्हाला पटते का ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: