यापूर्वी वर्षानुवर्षं केंद्रात काँग्रेसचीच सत्ता होती। विरोधकांना वाव नव्हता. पण तो काळच वेगळा होता. राजकारण्यांवर विश्वास असणा-यांची पिढी तेव्हा होती. काहीतरी विधायक घडेल अशी आशा होती. पण ही परिस्थिती झपाट्यानं बदलली. जे काही चाललंय , ते आपल्यासाठी नाही तर विशिष्ट मंडळींसाठीच चाललंय , असं चित्र निर्माण झालं. एका झटक्यात सर्वांचा ; विशेष करून तरूणांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडाला. वर्तमानपत्र उघडावं , तर बातमी असणार-अमूक मंत्र्याच्या नावावर एवढी जमीन , एवढी संपत्ती. अमूक एका नोकरशहाकडे कोट्यवधी रूपये किंमतीचे चार-पाच फ्लॅट! हे असं चित्र असल्यावर तरूण पिढीचा साहजिकच असा समज होणार की , जे काही चाललंय , ते आमच्यासाठी नाहीच आहे. आमची कुणाला फिकीरच नाही. त्यामुळे जे काही करायचं ते आपल्याला स्वबळावरच करायचंय , अशी मानसिकता या पिढीची होऊ लागलीय.
अर्थात सगळं काही वाईटच घडतंय , असंही नाही। पण आजचा तरूण सजग झालाय. विचार करू लागलाय. त्याला वायफळ गोष्टींमध्ये रस नाहीये. करिअरचं लक्ष्य त्यांच्यापुढे आहे. ' बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर ', अशी सडेतोड भूमिका ते घेऊ लागलेत.अशा तरूणांना काय अपेक्षित आहे , हे हेरून त्यांना प्रगतिपथावर नेण्यात राजकारणी कमी पडताहेत. राजकारणाने आणि राजकारण्यांनी तरूण पिढीचं खच्चीकरण केलंय. आठ-वर्षांपूर्वी मुलं राजकारणावर गप्पा मारायची , चर्चा करायची. आता दिसतात ? तुमचं राजकारण त्यांना काही देत नसेल तर फुकाच्या गोष्टीत त्यांनी वेळ का घालवावा ?
मी कॉलेजात होतो तेव्हा फक्त दूरदर्शन दिसायचं। मोजक्या घरांमध्ये फोन असायचे. मी जे. जे. स्कूल ऑफ आकिर्टेक्चरमध्ये शिकत होतो. तेव्हा मौजमजा काय ? तर मित्रांबरोबर मेट्रो , इरॉस , लिबर्टी यापैकी एका थिएटरमध्ये जावून सिनेमा बघणं. आर्टचा विद्यार्थी असल्यामुळे तसा फारसा वेळ मिळायचाच नाही. बहुतेक वेळ ड्रॉईंग काढण्यात जायचा. आणि आता ? शंभरावर जास्त चॅनेल बघायला मिळतात. इंटरनेट आलंय. मोबाइल तर प्रत्येकाच्या हातात दिसू लागलाय. या माध्यमातून आजच्या तरूणाला सगळं जग जवळून पाहायला मिळतंय. जगात काय चाललंय , याची त्याला खडानखडा माहिती आहे. अशा वेळी तो या जगाची आणि स्वत:च्या जगाची तुलना करून बघणारच. बाहेरच्या जगात जे काही उपलब्ध आहे , ते त्याला इथं मिळत नाहीये. या तरूणांचं प्रतिबिंब राजकारणात , समाजकारणात दिसत नसेल तर ती राजकीय पक्षांची आणि नेत्यांची हार आहे. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षं लोटली तरी आपण वीज , पाणी , बेरोजगारी याच विषयांवर काथ्याकूट करतोय. तरूण पिढीला कधी कुणी विचारात घेतलंय ? कुणाचंही सरकार आपल्यासाठी काही करत नाही , अशी त्याची भावना झालीय.
आजचे तरूण-तरूणी प्रायव्हेट शाळेत जातात , कॉलेजही प्रायव्हेट , नोकरीला लागतो तेही प्रायव्हेटमध्ये। आपलं सगळंच प्रायव्हेटच्या माध्यमातून चाललंय , तर मग सरकार कशाला पाहिजे किंवा ते कुणाचंही असलं तरी आपल्याला काय फरक पडतो , असा विचार त्यानं केला तर त्यात वावगं काय ? बिल गेटस् गुजरातला भेट देतो. काही वर्षांपूर्वी प्रगतीच्या दृष्टीने देशात पहिल्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र आज १४व्या क्रमांकावर घसरला आहे. इथल्या तरूण पिढीने काय अर्थ काढायचा ? तिकडे नरेंद मोदी गुजरातच्या प्रगतीचा विचार करतात. आपल्या इथं काय चित्र आहे ? का नाही तरूण उद्विग्न होणार ?
विधायक गोष्टीही घडत आहेत. आज जे काही साधलं आहे , त्यात उद्योगजगताचं योगदान मोठं आहे. नवनव्या मोबाइल कंपन्या , टेलिव्हीजन कंपन्या उदयास आल्या. या उद्योगांमध्ये अनेक तरूणांना संधी मिळाली. पण अशा तरूणांचं सेक्टरही मर्यादित आहे. मुंबई आणि ग्रामीण भागातील तरूणांमध्ये आजही फरक आहे. ग्रामीण भागातल्या तरूणांचे प्रश्ान् वेगळे असतात. एकतर तिथं मिळणारं शिक्षण एवढ्या टुकार दर्जाचं असतं की विचारायची सोय नाही. तिथल्या तरूण पिढीला इंटरेस्ट वाटावं असं काही असावं की नाही ? पण नाही. त्या पातळीवरही ठणाणा! शेती , लोडशेडिंग , उसाचा भाव यासारख्या त्याच्या समस्या. मंुबईत आल्यावर तो पॉश थिएटर्स , मॉल्स , हॉटेल्स बघतो. त्यामुळं इथं काही समस्या असतील असं त्याला वाटत नाही. मंुबईच्या तरूणालाही ग्रामीण भागाबद्दल असंच वाटतं. शेती असल्यामुळं नोकरीची गरज नाही. अन्नधान्याचा प्रश्न नाही , त्यामुळे कसल्या कटकटी नाहीत , असं त्याला वाटतं. हा विचारातला फरक आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील युवकांचे प्रश्न वेगळे आहेत , असं मला वाटत नाही.
मी परदेशात अनेकदा भटकंती केलीय। तिथल्या ग्रामीण आणि शहरी भागातही फरक आहे. फरक काय तर शहरात थिएटर्स , मॉल्स मोठ्या प्रमाणावर आहेत. ग्रामीण भागात ते मोठ्या प्रमाणावर नाहीत , इतकंच! बाकी विचारसणीत आणि इतर बाबींमध्ये फारसा फरक नाहीये. पण तिथली मुलं शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच स्वत:च्या पायावर उभी राहतात , पैसा कमावतात आणि मग आयुष्याचा आनंद लुटतात , धमाल करतात. आपली मुलं आईवडिलांच्या जिवावर धमाल करतात. असो. पण हेही चित्र बदलतंय.
माझा पहिला परदेश दौरा होता स्वीत्झर्लंडचा! खूप सुंदर देश आहे। सर्व सुखसोयींनी युक्त असा हा देश पाहिल्यावर मला प्रश्न पडला की सगळं काही आलबेल असेल , तर मग इथले विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात भांडत असतील कोणत्या मुद्यावर ? भांडायला काही कारण तरी हवं ना ? पण त्यांचेही काही प्रश्न-समस्या आहेत. युवकांशी संबंधित समस्या त्यांनाही काहीप्रमाणात भेडसावत असतात. आपल्या इथं हे प्रमाण जास्त आहे.
मी भारतीय विद्यार्थी सेनेचा प्रमुख झाल्यानंतर महाराष्ट्रभर भटकंती सुरू झाली। विविध क्षेत्रातील असंख्य तरूण भेटायचे. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे. ' साहेब ते पंचायत समितीचं असं हाय बघा ', ' साहेब ते शेतीचं उत्पादन यंदा असं आहे ', ' साहेब कलाक्षेत्रात असं चाललंय '... हे असे प्रत्येकाचे प्रश्ान् निरनिराळे. त्यांचे हे प्रश्ान् कोण लक्षातच घेत नाही. या युवकांना समजून घेणारंच कुणी नाहीये. राजकारण्यांकडे ती व्हिजनच नाही. नेत्रदान करता येते , पण ' दृष्टि ' दान करता येत नाही ना...असो.
प्रत्येकजण आजच्या तरूण पिढीबद्दल विचार मांडत असतो। काहींना वाटतं , सध्या समाजात श्रीमंतांची मुलं आणि सर्वसामान्यांची मुलं यांच्यात दरी पडते आहे. बदलत्या जगात आपल्यालाही श्रीमंतांच्या मुलांसारखं स्टाइलमध्ये राहता आलं पाहिजे , ही भावना बळावू लागल्यामुळे सर्वसामान्य मुलं त्यासाठी वाईट मार्गाला लागण्याची शक्यता आहे , असं काहींचं म्हणणं आहे. मला हे पटत नाही. मला काही तरी मिळवायचं , असा ध्यास युवकांनी घेतला तर बिघडलं कुठं ? मोठी स्वप्नं बघितलीच पाहिजेत. टाटांपेक्षा मोठा उद्योगपती व्हायचं , अशी जिद्द धीरुभाई अंबानींची होती. तशी जिद्द होती म्हणून त्यांच्या कपंनीचा आज प्रचंड विस्तार आणि दबदबा निर्माण झालाय. माणसं मोठी स्वप्न बघतात. ती पूर्ण करण्याच्या ध्यासापोटी झपाटतात. काही माणसांची बुद्धी भ्रष्ट होते , तर काही कष्ट करतात आणि यशाचं शिखर गाठतात. स्वप्न कसं पूर्ण करायचं , हे ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे. शेअर घोटाळा प्रकरणातला बिग बुल हर्षद मेहता याने जी काही ' करामत ' करून दाखवली , ती करताना त्याने डोकं लढवलं , याचा अर्थ तो बुद्धिमान होता. पण आपली बुद्धी त्यानं भलत्या कामासाठी वापरली आणि अडकला. तेच जर का तो विधायक मार्गाने गेला असता तर देशाचा अर्थमंत्रीही झाला असता. त्यामुळे युवकांनी याचं भान कायम बाळगलं पाहिजे.
युवकांना काही प्रमाणात का होईना सामाजिक-राजकीय भान असतं। पण मुली मात्र त्याबाबत उदासीन असतात। आपण भलं आपलं काम भलं , असा त्यांचा स्वभाव असतो , त्यांना सामाजिक देण्याघेण्याशी काही पडलेलं नसतं , असाही सूर काहीजण आळवतात. पण मी म्हणतो , तुम्ही असा उलटा विचार का करता ? मुलींनी सगळ्या प्रक्रियेकडे आपुलकीनं बघावं , त्यात रस घ्यावा , असं काही ठेवलं आहे का तुम्ही ? त्यांना इतर गोष्टींपेक्षा शाहरुख खानचा , सलमान खानचा पिक्चर बघण्यात रस वाटतो , तर त्यात बिघडलं कुठं ? एकतर त्यांना आकर्षण वाटेल असं आपण काही करायचं नाही , वर आणखी त्यांनाच हिणवायचं , हा काय प्रकार आहे ?
तरूणांच्या हाती नेतृत्व सोपवण्याचा विषय येतो , तेव्हा काही महाभाग तारे तोडतात-कशाला ? ते अजून सज्ञान कुठं आहेत. त्यांच्याहातून चुका होतील. मी म्हणता , े गेली ६० वर्षं तुम्ही काय करत होता ? चुकाच करत आलात ना! तुम्ही तर चांगलेच परिपक्व होता , अनुभवी होता. तरीही चुका केल्याच ना! मग तरूणांनी केल्या तर तुम्हाला का कळ लागते ? हल्लीचे तरूण उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात आणि तिथंच भक्कम पगाराच्या नोकऱ्या बघतात आणि सेटल होतात. त्यांच्या ज्ञानाचा या देशाला काहीच फायदा होत नाही , असं काही मंडळी बोलतात.
मला सांगा , अमेरिका असो वा फ्रान्स असो , तिथला तरूण भारतात शिक्षण घेऊन , इथंच स्थायिक व्हायचं , असा विचार करतो का ? नाही ना ? कशाला करेल ? त्याच्या देशात त्याच्या सर्व गरजा पूर्ण होताहेत , त्याच्या गुणवत्तेला वाव मिळतोय , त्याच्या बदलत्या मानसिकतेला त्यांच्या देशात समजावून घेतलं जातंय। आपल्या इथं होतं असं ? मग सांगा , आपल्या देशातील मुलांना त्यांचं जीवन समृद्ध करणारा पर्याय सापडला , तर त्यात त्यांना दोषी का धरायचं ? अरे असं काही तरी करून दाखवा की उद्या अमेरिका किंवा फ्रान्सच्या तरूणाला इथं येऊन शिक्षण घ्यावं , इथंच स्थायिक व्हावं , असं वाटलं पाहिजे। पण तेवढी आपली झेप आहे ? नुसत्या आपल्या बाता मारायच्या.
मी जेव्हा तरूण पिढीला राजकारण्यांनी काय दिलं याचा विचार करू लागतो , तेव्हा मला प्रचंड संताप येतो , चीड येते। राजकारण्यांनी तरूण पिढीला सडवून टाकलंय. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती-पुण्यतिथीला मी भगुरला जातो. सावरकारांच्या पुतळ्याकडे बघताना माझ्या मनात विचार येतो की , काय वाटत असेल या महापुरुषाच्या आत्म्याला ? स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. पण आज काय परिस्थिती आहे ?...
हल्ली मुंबईत होर्डिंग-बॅनरचं पेव फुटलंय। वाढदिवसाच्या शुभेच्छा , अमक्याची अमूक पदावर नियुक्ती म्हणून शुभेच्छा , अशा असंख्य कारणांसाठी बॅनर झळकतात. पूवीर्ही असे बॅनर लागयचे , पण त्याच्यावर मुख्य नेत्याशिवाय अन्य कुणाचा फोटो नसायचा. आजचे बॅनर बघा. एकेका बॅनरवर मिसरूड फुटत असलेल्या पोरांचे ढिगभर फोटो असतात. राजकारणात पडलो म्हणजे सर्व काही मिळेल , असा या तरूणांचा विचार असतो की काय , असा मला प्रश्ान् पडतो. आता तुम्हाला वाटेल की , तरूणांनी राजकारणात पडू नये , असं या माणसाचं म्हणणं दिसतंय. पण मी त्या अर्थाने बोलत नाहिये. तरूणांनी राजकारणात आलंच पाहिजे.
ज्याला कोणत्याच क्षेत्रात काहीच करता येत नाही , तो राजकारणात येतो , अशी शेरेबाजी होत असते। उलट राजकारणात सुविद्य तरूणवर्गाची आवश्यकता आहे. पण फक्त बॅनरवर फोटो छापला म्हणजे राजकारण करता येतं , हा कुणाचा भ्रम असेल तर तो दूर करा. राजकारणात पडताना तुम्हाला असंख्य गोष्टींचं भान असावं लागतं , ज्ञान असावं लागतं , सामाजाच्या प्रत्येक घटकाची माहिती असावी लागते , तरच तुम्ही राजकारण करू शकता. नाहीतर फक्त पांढरे शुभ्र इस्त्रीदार कपडे , हातात दोन-दोन मोबाइल , अशा पद्धतीचं ' राजकारण ' करू शकता. त्यामुळे मी तरूणांना आवाहन करेन की , तुम्ही राजकारणात जरुर या. आज तरूण , सुविद्य तरूण पिढीची देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी आवश्यकता आहे. त्यामुळे तरूणांनी पूर्ण तयारीनिशी आणि आत्मीयतेने या क्षेत्रात यावं.
जरा आपण आता मंुबईकडे वळू। मंुबईतून मराठी माणूस हद्दपार होतोय , हे खरं आहे। पण इथल्या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेता न आल्यानं किंवा त्यासाठी लागणारी ताकद (नसलेलं आथिर्क पाठबळ , उद्योग-धंदा करण्याची नसलेली क्षमता , राजकारण्यांनी केलेलं खच्चीकरण वगैरे वगैरे) नसल्यामुळं कदाचित या आधीच्या पिढीला या बदलाचा सामना करता आला नसावा. पण आताची मराठी तरूण पिढी मात्र मंुबईतच पाय रोवून उभी राहणार , असा मला विश्वास आहे. कारण सध्याचा मराठी युवक करिअरसाठी झपाटलेला आहे. मोठमोठ्या उद्योगधंद्यात , व्यवसायात , आयटी सेक्टरमध्ये त्यानं शिरकाव केला आहे. फक्त शिरकावच केलाय असं नाही , तर त्यानं भक्कम पाय रोवलेत. त्याच्याकडे शिक्षण आहे , उच्च शिक्षणाची , वेगवेगळ्या क्षेत्राची माहिती घेण्याची आस त्याला आहे. चांगलं शिक्षण घेऊन तो वेगळ्या वाटा चोखळतोय , भक्कम पगाराच्या आणि मानाच्या पदाच्या नोकऱ्या त्याच्या पायाशी लोळण घेताहेत. त्याच्या मानसिक वृत्तीत कमालीचा बदल झालाय. स्पधेर्चा-आव्हानांचा सामना करत यशाचं शिखर काबीज करण्याची जिद्द त्याच्यात निर्माण झालीय. अशा या मराठी तरूणाला मंुबईबाहेर हद्दपार करण्याची कुणाची टाप आहे , सांगा ? पण त्यासाठी आपण घट्ट उभं राहणं आवश्यक आहे.
काही जणं असं म्हणतात की तरूण वर्गाला माझ्याविषयी प्रचंड आकर्षण आहे. (कदाचित अजून मी निवडणुकीला उभा राहिलो नसेन म्हणून असेल.) खरं सांगू , मी त्याविषयी कधी विचारच केला नाही. कदाचित मी त्यांची भाषा बोलत असेन , म्हणून माझ्यावर तरूण पिढी प्रेम करत असेल. पण मी प्रामाणिकपणे सांगतो , त्यांना साद घालताना माझ्या मनात अजिबात स्वार्थ नाही. मला या राज्यात बदल घडवून आणायचा आहे. राज्याच्या प्रगतीविषयी , तरूण पिढीला वाव देण्यासाठी माझ्या डोक्यात काही योजना तयार आहेत , काही कल्पना आहेत. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला तर या राज्याचा कारभार मी सुतासारखा सरळ करेन , याची मात्र ग्वाही देतो.
- राज ठाकरे
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा