सप्तर्षि
सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणाला धर्मवाट दिली। महाराजांना ही बातमी समजताच। त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले - "स्वत:ला सरनौबत म्हणवता? तुम्ही तो केवळ शिपाईगिरीच केली! बहलोल इतुका बहुत वळवळ करीत आहे, त्यांस मारुनी फ़त्ते करणे अन्यथा आम्हांस तोंड न दाखविणे!"। तीच चिड मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजरांनी नेसरी येथे अवघ्या सहा अंगरक्षकांसहीत बहलोलखान पठाणाच्या फ़ौजेवर हल्ला चढवला आणि अजुन एक खिंड पावन झाली.
काय घडविले? कसे म्हणावे सेनापती सुजाण?
कुणा विचरुनी दिला सोडुनि, खासा बहलोल पठाण? -१
पुनश्च अडवा, धुळीस मिळवा, प्रयत्ने भगिरथ करुनी।
तोवर अमान्य असें अम्हांसी, बघणे तव मुख फ़िरुनी। -२
शब्द नव्हे ते कट्यार फ़िरली, उभी काळजा वरती।
गळुन पडला खलिता खाली, नयनांत आसवे भरती -३
रक्त तापले, श्वासागणिक फ़ुलु लागली छाती।
मांड टाकली घोड्यावरती, उडु लागली माती। -४
सात अश्व चौखुर उधळले, तडीताघातासाठी।
म्यानातुनी जणु वीज घेतली, ढाल घेतली पाठी। -५
पठाण दिसता वेग वाढला, ढळुन गेला तोल।
पतंग येता अग्निवरती, खुशीत ये बहलोल। -६
अरीसेनेसी छेदत सुटले, सात शिवाचे बाण।
छातीवरती घाव झेलले, अखेर सुटले प्राण -७
सप्तदलांचे बिल्वपत्र ते, पायी शिवाच्या पडले।
श्वास रोखुनी धरती सारे, आक्रितची हे घडले। -८
बेभान होउनी लढले-पडले, वीर मराठी सात।
तम छेदूनी उर्ध्व दिशेला, झाले सप्तर्षि नभात। -९
© सौरभ वैशंपायन(मुंबई).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा